write.as

ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातुन ऑटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्वल होणार – सुधीर मुनगंटीवार/ पात्र ऑटोरिक्षा चालकांना म्हाडाच्या घरांचे ऑफर लेटर वितरीत./ साडेदहा लाख रूपयांचे घर साडेचार लाखात उपलब्ध होणार, महाराष्ट्रातील पहिली व एकमेव घटना.

विरोधी पक्षाचा आमदार असतानाही ऑटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानसभेच्या माध्यामतुन संघर्ष केला व नेहमी ऑटोरिक्षा चालकांना साथ दिली. आजही सत्तेत आल्यानंतर ऑटोरिक्षा चालकांच्या कल्याणाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. गेल्या अर्थसंकल्पात ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद केली. या मंडळाच्या स्थापनेचा मसूदा तयार असून लवकरच हे मंडळ स्थापन होईल. या माध्यमातुन मुलांचे शिक्षण, घर, आरोग्य आदी प्रश्नांचे निराकरण होणार आहे. येत्या काही दिवसातच या मंडळाच्या माध्यमातुन ऑटोरिक्षा चालकांचे भविष्य उज्वल होईल, अशी ग्वाही अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

दिनांक 25 जुलै रोजी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र ऑटोरिक्षा चालकांना म्हाडा च्या घरांचे ऑफर लेटर वितरण कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आ. नानाजी शामकुळे, म्हाडा चे सभापती तारिक कुरैशी, आ. संजय धोटे, महापौर सौ. अंजली घोटेकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भिमनवार, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, बळीराम शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, येत्या 15 ऑगस्टला जेव्हा घरांची चावी ऑटोरिक्षा चालकांच्या हाती येईल तेव्हा मला विशेष आनंद होईल. ऑटोरिक्षा चालकांनी नविन परमीट ची मागणी केली आहे. ती सुध्दा निश्चीतपणे पूर्ण करण्यात येईल. जे ही काम करायचे ते मनापासून केल्यास त्यात निश्चीतपणे यश मिळते यावर माझा विश्वास आहे. देशातील सर्वोत्तम सैनिक शाळा चंद्रपूर जिल्हयात साकारली आहे. टाटा ट्रस्ट च्या सहकार्याने कॅन्सर हॉस्पीटल जिल्हयात उभे राहत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालये अशी शिक्षणाची प्रशस्त दालने आपण उपलब्ध केली आहे. मिशन शौर्य च्या माध्यामतुन जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांनी माऊंट एव्हरेस्टवर झेंडा फडकविला. मिशन सेवा च्या माध्यामतुन स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना आपण बळ दिले, अभ्यासिका उभारल्या. आता मिशन शक्ती च्या माध्यामतुन येत्या ऑलिंपीक स्पर्धेसाठी प्राविण्यप्राप्त खेळाडू तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मिशनच्या शुभारंभासाठी सिनेअभिनेते आमीर खान 4 ऑगस्ट ला येत आहे. विकासाच्या मार्गावर चंद्रपूर जिल्हा अग्रेसर झाला आहे याचा मला विशेष आनंद आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

नविन चंद्रपूर परिसरात दाताळा ब्रिज साकारत आहे. म्हाडा कॉलनी परिसरात उत्तम रस्ते तयार करण्यात येणार आहे. इरई च्या किना-यावर रिव्हर फ्रॅन्ट तयार होत आहे. म्हाडा च्या परिसरात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करत हा परिसर आकर्षक करण्यावर आपला भर असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी बोलताना म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी म्हणाले, साडेदहा लाख रू. किंमतीचे घर साडेचार लाखात आपणास उपलब्ध होत आहे, ही महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव घटना आहे. याचे श्रेय सर्वस्वी ना. मुनगंटीवार यांना जाते. पंडीत दीनदयाल उपाध्याय यांचे अंत्योदयाचे स्वप्न ना. मुनगंटीवार प्रत्यक्षात पूर्ण करीत आहेत. असा नेता या जिल्हयाला लाभला हे जिल्हावासियांचे भाग्य असल्याचे तारिक कुरैशी यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडाचे मुख्याधिकारी संजय भिमनवार यांनी केले. यावेळी आ. नानाजी शामकुळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन उषा टेंभुर्डे यांनी केले. कार्यक्रमाला ऑटोरिक्षा चालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. अधिक माहिती साठी वाचा  http://sudhirmungantiwar.blogspot.com