write.as

80 वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन - सुधीर मुनगंटीवार मुंबई दि. ३: शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वय वर्षे ८० ते ८५ दरम्यान ज्यांचे वय आहे त्यांना मुळ निवृत्तीवेतनात १० टक्के, ८५ ते ९० वय असलेल्यांना १५ टक्के, ९० ते ९५ वय असलेल्यांना २० टक्के, ९५ ते १०० वय असलेल्यांना २५ टक्के आणि वय वर्षे १०० पेक्षा अधिक असलेल्या सेवानिवृत्तीधारकांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना मूळ निवृत्तीवेतनात ५० टक्के वाढ देण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच घेतला आहे. वित्त विभागाने दि. ३० जुलै २०१९ रोजी निर्गमित केलेल्या शासननिर्णयान्वये वरील वयवर्षांच्या टप्प्यात सेवानिवृत्ती तसेच कुटूंबनिवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त वाढीव निवृत्तीवेतन देण्याची कार्यवाही कशापद्धतीने करावयाची आहे, वेतनआयोगाचे लाभ देतांना कशाप्रकारे त्याची निश्चिती करावयाची आहे याची उदाहरणासह माहिती दिली आहे. ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यामधून सेवानिवृत्त झालेल्या व ८० वर्षे व त्यापुढील निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनाही हा निर्णय लागू राहील असेही वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.अधिक माहिती साठी वाचा http://sudhirmungantiwar.blogspot.com